लहानपणापासून आपल्याला स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे सांगण्यासाठी हा श्लोक ऐकवला जातो.
“सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ”.
म्हणजे असे की जो मनुष्य सुख आणि दु:ख, लाभ आणि हानी यांना समान मानतो तो स्थितप्रज्ञ. आणि सर्वांनी स्थितप्रज्ञ असावे, हे गुण अंगात आणावेत, किंवा स्थितप्रज्ञ माणसाचा आदर्श ठेवावा असे आपल्या मनावर बिंबवले जाते. पण परवा माझ्या वाचनात गीतेतला हा पूर्ण श्लोक आला. त्यामुळे माझ्या पटकन लक्षात आले, की अपूर्ण श्लोक आपल्या पूर्ण समाजाला सांगितल्यामुळे आपले एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून अत्यंत नुकसान झाले आहे.
पूर्ण श्लोक असा आहे,
सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥
- भगवद्गिता अध्याय २, श्लोक ३८
ह्याचा अर्थ असा, “सुख-दु:ख, लाभ आणि हानी, किंवा विजय व पराभव ह्यांना सारखं मानून तू युद्धासाठी तयार हो. म्हणजे तुला पाप लागणार नाही. ” . कुरूक्षेत्रावर स्वत:चा क्षत्रिय धर्म विसरून कर्मत्याग करणारया अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण स्वत: असा उपदेश करीत आहेत की, “युद्धात होणारया निर्णयाचा विचार न करता तू फक्त तुझे कर्तव्य कर. एक धनुर्धारी म्हणून, एक योद्धा म्हणून, एक क्षत्रिय म्हणून रणभूमीवर युद्ध करणॆ हे तुझे कर्तव्य आहे. तू केवळ तुझे कर्म कर व फळ मला अर्पण कर. त्यामुळे तुला कोणतेही पाप लागणार नाही.”
आता मी असे का लिहिले कि अर्धा श्लोक आम्हाला सांगितल्यामुळे आमच्या समाजाचे, राष्ट्राचे नुकसान झाले आहे? माझे असे मत आहे, की आम्हाला असे सांगण्यात आले की जर तुम्ही सगळे सहन केले आणि तरीही मन शांत ठेवले तर तुम्ही स्थितप्रज्ञ. कोणीही कितीही आक्रमणे करू दे, कोणीही कितीही लबाडीने वागू दे, कोणीही आमच्या देशावर आमच्या संस्कृतीवर हल्ले करू दे, पण आम्ही स्थितप्रज्ञ राहणे आवश्यक आहे. जगातील इतर देश श्रीमंत झाले तरी चालतील, आम्ही मात्र प्रगतीची, समृद्धीची वाट धरू नये, कारण सुखात काय आणि दु:खात काय शेवटी स्थितप्रज्ञ असणॆ महत्त्वाचे.
म्हणून एक राष्ट्र म्हणून, भारताने भगवान श्रीकृष्णांचा हा उपदेश, ह्या श्लोकात सांगितलेला, समजून, उमजून आचरणात आणला पाहिजे. तरच आमच्या राष्ट्राची प्रगती होईल आणि एक सुरक्षित आणि समृद्ध भारत निर्माण होईल.
आय लव माय India........
0 comments:
Post a Comment